1990 साली सुरू केलेले माऊली आरोग्य सेवा केंद्र गेली 26 वर्षे अविरतपणे सुरू असून एकूण 10,000 वनवासी लोकसंख्येपैकी 6,500 रुग्ण लाभार्थी झाले आहेत. तज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार व नियमित तपासणीमुळे त्वचारोगासारख्या आजारांचे निर्मुलन झाले आहे. अन्य रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. स्वच्छता, आहार- विहारावर योग्य सल्ला व रुग्णांची काळजी या गोष्टी उपचार व प्रबोधनामुळे शक्य झाल्या. याचाच परिणाम म्हणजे यासंबंधी समाजात आलेली जागृती. हे सर्व फलित 26 वर्षाच्या रुग्णसेवा शिबिरामुळे शक्य होत आहे. अर्थात याचे सारे श्रेय केंद्रावर येणा-या निष्णात डॉक्टर्स व त्यांना सहाय्य करणा-या कर्तव्यनिष्ठ सहका-यांना द्यावे लागेल.
2011 मध्ये सुरू केलेल्या फिरत्या रुग्णालयाच्या प्रयोगाचा आमचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. काही वनवासी पाड्यांवर पावसाळ्यामध्ये जाणे दुरापास्त होते त्यावेळी ही सेवा खंडीत करावी लागते. परतु उर्वरीत 8 महिने दुरस्त पाड्यावरील वनवासी वृध्द महिला, वृध्द पुरूष व लहान बालके यांना प्रामुख्याने या सेवेचा फायदा होतो. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणा-या 400 मुलामुलींची आरोग्य तपासणी शाळांमध्ये जाऊन करण्याचा मानस आहे. रविवार सुट्टी सोडून या सेवेसाठी तज्ञ डॉक्टर्स व सहकारी उपलब्ध व्हावेत असे आमचे प्रयत्न सुरू आहेत.