माउली विद्यार्थी वसतिगृह परिसरातील वनवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आल्याने 1996 सालापासून करवीर पिठाधीश श्री शंकराचार्य यांच्या पवित्र हस्ते उद्घाटन झालेल्या माउली विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून 12 ते 15 विद्यार्थ्यांच्या जीवन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. त्यांना सुशिक्षित, सुसंस्कारीत व स्वावलंबी बनवून ते आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी उत्तम कार्यकर्ते तयार व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. येथे राहून अधिकाधिक शिक्षण त्यांनी घ्यावे असा संस्थेचा प्रयत्न असतो. शिक्षण, संस्कारांबरोबरच संगणकाचे प्राथमिक शिक्षणही त्यांना दिले जाते. घरी शिक्षणाचे वातावरण नसल्याने व शाळेतील शिक्षणही यथातथाच असल्याने त्यांचा येथे अभ्यास करून घेतला जातो. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली आहे. व्यवसाय मार्गदर्शनही या विद्यार्थ्यांना केले जाते.
शिक्षणाबरोबरच संस्कारावर विशेष लक्ष दिले जाते. भेटकार्डे बनविणे, अगरबत्ती ( उदबत्ती) बनविणे इत्यादिंचे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या उत्पादनामध्ये त्यांचे सहकार्य घेण्यात येते.
आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे विद्यार्थी संख्येत फार वाढ करणे शक्य होत नाही. आतापर्यंत 120 विद्यार्थी वसतिगृहात राहून गेले. काहींनी 8वी, 10वीतच शाळा सोडली. 120 विद्याथ्यापैकी 20 विद्यार्थी 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरी व्यवसाय करीत आहेत. वसतिगृहातील विद्याथ्याची प्रगती पाहून परिसरातील अन्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यात संस्था यशस्वी झाली आहे. 1990 मध्ये परिसरात एकूण 4 प्राथमिक शाळा होत्या. परंतु पटावरची संख्या फार कमी होती. सध्या एकूण 12 शाळा असून 400 पेक्षा अधिक मुले प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत. काही गावातून माध्यमिक वर्ग सुरू झाले आहेत. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून त्यांना चांगली शालेय दप्तरे, वह्या व इतर शालेय साहित्य, चपला, बूट, गणवेश, कपडालत्ता यांचे काही शाळांमधून वाटप करण्यात आले आहे. या कमी ‘सेवा फॉर यूथ’ व ‘जीवनआनंद- एक अनुभूती’ या संस्थांकडून मोलाचे सहकार्य लाभले आहे.