महाराष्ट्रातील , विशेषतः ठाणे रायगड जिल्ह्यातील विविध वनवासी सेवा उपक्रमांना भेटी देणं सुरु झाले. सुरुवातीला हिन्दुसेवासंघ मामणोली, वनवासी कल्याणाश्रम चिंचवली, तत्पश्चात सुंदरनारायण गणेश संस्थान -देवबांध, कोळिंबे, बेरिस्ता , चालतवड व तलासरी येथील प्रमुख वनवासीकल्याण प्रकल्पाना भेटीची देऊन बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. त्या त्या उपक्रमांच्या आवश्यकतांनुरूप यथाशक्ती वस्तुरूप सहकार्य करण्यास सुरुवात केली गेली.
हे सर्व करत असताना आवश्यक त्या निधीची कमतरता जाणविणे स्वाभाविकच होते. त्यामुळे निधी संकलनाचे काही मार्ग आखण्यात आले. सर्वप्रथम सांस्कृतिक / कारमणूकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले.
निर्धारित कार्याची व्याप्ती व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे समीकरण तरीही व्यस्तच राहिले परंतु आमच्या कार्योत्साहाला वास्तव बळ मिळालं, ते डोंबिवलीतील एका सहकार्यप्रवण सेवाभावी सुहृदांच्या औदार्यामुळे !
त्यांनी पनवेल तालुक्यातीलभूखंड संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या 'देहरंग ' या गांवातील एक भूखंड संस्थेस बक्षिस म्हणून दान केला. त्याचे भूमापन झाल्यावर तेथे एक वास्तू उभी करण्याचे निश्चित झाले.
यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील 'पाबळ' या गावी असलेल्या 'विज्ञान आश्रमाने ' संशोधित केलेल्या घुमटाकार वास्तूच्या आधारावर ९ एप्रिल १९९० रोजी संस्थेची केंद्रवास्तू उभी करण्यात यश आले आणि 'श्री माउली आरोग्यसेवा केंद्र' त्यावास्तुत सुरु झाले.
'देहरंग' परिसर त्यावेळी अत्यन्त दुर्गम म्हणविला जायचा. त्यामुळे प्रचंड वारा वादळ पावसाच्या घणाघाती माऱ्याच्या परिणामी उपलब्ध असलेल्या कच्या रस्त्याचीही दैना व्हायची ! तरीही आरोग्यसेवेत खंड पडला नाही . १९९३- २००१ या काळातील सातत्यपूर्ण योगदान, उत्कृष्ट चिकित्सा आणि परिणामकारक उपचार पद्धतीमुळे आमची आरोग्यसेवा असहाय रुग्णांच्या विश्वासाची ठरत गेली. 'लाभार्थी' रुग्णांची शिस्तबद्ध नोंदणी होत गेली.
१९९०-९४ याकाळात केंद्राच्या टेकडीखाली असलेल्या नदीतूनच पिण्याचे पाणी वाहून आणावे लागत असे.पाण्याची वाहतूक डोक्यावरून करावी लागायची. अशा वेळेस कठोर परिश्रमांनी आम्ही जुन्या विहिरीचे उत्खनन करून पाणी वाहून आणण्याच्या त्रासापासून मुक्त झालो.
१९९७ अखेर 'थ्री फेज विद्यतपुरवठा' महत्प्रयासांती उपलब्ध झाला !! आणि विहिरीवर पंप बसविला गेला.
त्याकाळात परिसरातील २२ पाडेवजा गांवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण 'नगण्य' म्हणजे १% हि नव्हते. मुलांवर शिक्षणाचे संस्कारच नव्हते हे दिसून आल्यावर परिसरातील ४ शाळांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करून सुस्थितीत आणण्याचे प्रयत्नही केले परंतु दुर्दैवाने आवश्यक त्या पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याची वेळ आली.
मुलांना शाळेची ओढ लावणे अत्यंत गरजेचे होते. वनवासी विद्यार्थ्यांची कौटुंबिक स्थिति आणि एकूणच आ वासून बसलेले 'अक्षर शत्रुत्व !' याचा गंभीर विचार करून आम्ही 'विद्यार्थी वसतिगृह' उभारण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांना 'शिक्षणाभिमुख' करता यावे. या निर्णयाला उत्तेजन मिळाले ते यासाठी दानरूपात उपलब्ध झालेल्या नवीन भूखंडामुळे !! परिणामी १ मे १९९६ रोजी 'श्रीमाउली' विद्यार्थीगृहाचे उद्घाटन झाले.
या दशकात नैसर्गिक उत्पादांना जणू उधाण आले होते. आमचे अपरंपार नुकसानही झाले परन्तु 'ईश्वरेच्छा बलियसी' म्हणून आमचे कार्य सुरूच राहिले कारण त्यावेळेस अनेक हितचिंतक,सेवाभावी दानशूर मंडळी पाठीशी उभी राहात गेली
जुनी घुमटाकार केंद्र वास्तू नैसर्गिक उत्पाद झेलत जीर्ण होत गेली. नवीन केंद्रवास्तू उभारण्याची गरज अनेक मान्यवरांनी रास्त ठरविली व त्यासाठी भरीव अर्थसहाय्य केले.
२००४ साली नूतन वास्तूत कार्य व्यवस्थित सुरु असताना वाढीव पाणीसाठ्याची गरज भासली. नदी ते केंद्र या ६५०० फूट अंतरासाठी जलवाहिनी व पंप बसविण्याचे कामी आमच्या अथक परिश्रमांना जपानी उद्योजक मंडळाचे भरीव अर्थसहाय्य लाभले. रात्रंदिन परिश्रम करून आम्ही नदीवरून पाणी केंद्रात आणण्यात यशस्वी झालो.ततपश्चात फलोद्यान, वनौषधी लागवड, गोशाळा विस्तार व विविध औषधांचे उत्पादन यासारख्या महत्वाच्या योजनांना चालना मिळाली.
या वास्तूचा उपयोग विविध समाजविकास कार्यांसाठी NSS सारख्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी उपयुक्त माध्यमासाठी,विविध नामांकित ज्ञानवंत सेवाव्रती यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यासाठी संस्था यशस्वीरित्या करित आहे.
२००८ साली वनवासी महिला सक्षमीकरण हा विषय समोर आला. 'शिलाई प्रशिक्षण' वर्गांचे आयोजन सुरु झाले. 'शिवणयंत्रे ' देणगीदाखल उपलब्ध होऊ शकल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 'शिवणयंत्रे ' दान करण्यात आली.वनवासी महिलांना व्यवसायाभिमुख करून स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला.
सर्व व्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी आवश्यक टी कार्यवाही नियमित स्वरूपात केली जाऊ लागली कौशल्यविकास योजनेनेही आकार घेतला.
स्वाभाविक प्रतिकूलतेला तोंड देताना संस्था 'आरोग्यसेवा' व 'शिक्षण सेवा' या मूलभूत उद्दिष्टांपासून विचलित झाली नाही. संस्थेचे विद्यार्थी शालान्त परीक्षेची सीमा ओलांडून ITI प्रशिक्षणातही यशस्वी होऊ लागले.
या सर्व गोष्टी चार दशके सुविहित ठेवण्याचा हा भगीरथ प्रयत्न आजही 'सत्कर्माची गंगा' प्रवाहित ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. कार्यकर्त्यांच्या निरलस, अथक परिश्रमांना अनेक सेवाभावी,उदार हितचिंतकांचें समयोचीत सहाय्य अखंड लाभत राहिल्यामुळेच हे साध्य होऊ शकले.
हा ऋणानुबंध अखंड राहो, ही अभिलाषा
सत्कर्मश्रध्दाश्रय | Developed By Sanmisha Technologies